कापूरहोळ
विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि अभ्यासातील एकाग्रता याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मनसदीप फाउंडेशनच्या ‘युवा दिशा’ प्रकल्पांतर्गत न्यू इंग्लिश हायस्कूल, कामथडी येथे विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य जपण्यासह मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात मनसदीप फाउंडेशनचे संस्थापक मानसोपचारतज्ज्ञ ऋषिकेश संजय इंगुळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील त्याची भूमिका स्पष्ट केली. किशोरवयात भावनिक स्वास्थ्य जपणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मानसोपचारतज्ज्ञ मानसी कुलकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी मूलभूत माहिती देत भावनिक स्वास्थ्याचे महत्त्व समजावून सांगितले. तर वैभव धोत्रे यांनी अभ्यासाचे नियोजन, एकाग्रता वाढविण्याचे उपाय आणि प्रभावी अभ्यासपद्धती याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वप्नाली पिंगळे यांनी मनोरंजक आणि सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविला.
मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आवाहन
आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वाढता वापर हा विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यासातील एकाग्रता, वेळेचे नियोजन आणि दैनंदिन सवयींवर होणाऱ्या परिणामांविषयी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईल वापराच्या सवयी तपासून पाहणे, अभ्यासासाठी निश्चित वेळ राखून ठेवणे आणि अभ्यासात सातत्य टिकविणे यावर भर देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याविषयी अधिक माहिती मिळण्यास, मोबाईल वापराबाबत आत्मपरीक्षण करण्यास आणि अभ्यास अधिक परिणामकारक पद्धतीने करण्यासाठी आवश्यक कौशल्ये समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुंभार सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ करणे, त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारांची रुजवण करणे आणि शैक्षणिक जीवनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा मनसदीप फाउंडेशनच्या ‘युवा दिशा’ प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.












