कापूरहोळ
महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत पहिल्या तीन टप्प्यांनंतर आता चौथ्या टप्प्याची यादी जाहीर झाली आहे. तालुक्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विकास सोसायट्यांच्या सचिवांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार सप्ताह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि लाभ मिळविण्यासाठी पूर्ण करावयाच्या प्रक्रियेची माहिती दिली.
५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान
योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तसेच १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेले कर्ज योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरू शकते. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.
मात्र, कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ मिळणार असल्याने या अटीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. विकास सोसायट्यांच्या सचिवांनी पात्र लाभार्थ्यांची माहिती तपासून त्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि अॅग्री स्टॅक नोंदणी आवश्यक
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित कर्जखात्याला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आणि ‘अॅग्री स्टॅक’ अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि सोसायटी सचिवांनीही याबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन
या मेळाव्यात नागरी सहकारी पतसंस्था आणि पगारदार पतसंस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच एमआयएस माहिती, नियामक मंडळाचे कामकाज आणि सहकार कायद्यातील विविध तरतुदींविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भोर सहाय्यक निबंधक आदिनाथ पालवे,संजय पवार जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी आशिष मारणे,शासकीय लेखापरीक्षक प्रशांत पांडेकर आणि अजय जाधव यांच्यासह सहकार क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.












