कापूरहोळ
भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्ट लॉजिंगमध्ये कथित अवैध वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी राजगड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) सायंकाळी 6.35 वाजता करण्यात आलेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , वेळू येथील आमराई रिसॉर्ट लॉजिंगमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून आर्थिक फायदा मिळवला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लॉजिंग चालक रघु शेट्टी (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) आणि वैभव बालाजी इंगळे (वय २५, मूळ रा. सरवडी, जि. लातूर; सध्या रा. आमराई रिसॉर्ट लॉजिंग, वेळू, ता. भोर) यांच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईनंतर अनैतिक मानवी व्यापारासारख्या गंभीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पुन्हा चर्चेत आले आहे. संबंधित प्रकरणात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शितल ठेंबे करीत आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक शितल ठेंबे-नेम, पोलीस कर्मचारी प्रतिमा भांड, निलेश राणे, गणेश नांदे, इंगळे आणि बाळेराव यांचा सहभाग होता.













