पानवडी दुहेरी हत्याकांडातील संशयित २४ तासांत जेरबंद! येरवड्यापासून नसरापूरपर्यंत पोलिसांचा थरारक पाठलाग; राजगड-सासवड पोलिसांची संयुक्त कारवाई


कापूरहोळ :

 पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने  निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. या दुहेरी हत्याकांडातील संशयिताला अवघ्या २४ तासांत राजगड आणि सासवड पोलिसांच्या संयुक्त पथकाला जेरबंद केले आहे. संशयिताचा शोध घेताना पोलिसांनी येरवडा, लक्ष्मीनगर, खराडी, कोंढवा, नवले ब्रिज, खेड शिवापूर टोलमार्गे चेलाडी-नसरापूर पुलापर्यंत पाठलाग केला. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे हत्याकांडाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

वृद्ध दाम्पत्याच्या हत्येने पानवडीत खळबळ

पानवडी येथे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३) या वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरवस्तीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे पानवडी गावासह संपूर्ण पुरंदर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी गणेश सुभाष धिवार (वय २७, रा. पानवडी) याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी तातडीने तपास सुरू केला.

जुन्या वादातून हत्याकांड झाल्याचा आरोप

गायी-बैल घेऊन जाण्यावरून झालेल्या जुन्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या वादाचे नेमके स्वरूप काय होते, त्यातून हत्येची घटना कशी घडली आणि त्यामागील अन्य काही कारणे आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

येरवडा ते नसरापूर; पोलिसांनी केला पाठलाग 

गुन्ह्यानंतर संशयिताचा माग काढण्यासाठी राजगड आणि सासवड पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी येरवडा, लक्ष्मीनगर, खराडी, कोंढवा, नवले ब्रिज, खेड शिवापूर टोल आणि पुढे चेलाडी-नसरापूर पुलापर्यंत पाठलाग केला. अखेर या संयुक्त कारवाईत संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

गुन्हा घडल्यानंतर अल्पावधीत संशयिताला पकडण्यात आल्याने पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे. या कारवाईत दोन्ही पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले आहे.

राजगड-सासवड पोलिसांच्या पथकाचा सहभाग

या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले, तुकाराम राठोड, सोनवणे यांच्यासह पोलीस हवालदार औदुंबर आडवाल, राहुल पठाडे, समीर भालेराव, पप्पू शिंदे, काळे, सोनवणे, लोंढे, शेंडे, मखरे तसेच पोलीस शिपाई अनिकेत सोनवणे, चारुदत्त देशमुख, राऊत, हिप्परकर, चव्हाण आणि कुमावत यांचा सहभाग आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत. संशयिताच्या चौकशीतून हत्येचा नेमका घटनाक्रम, हत्येमागील कारण आणि अन्य संबंधित बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


20
कृपया वोट करें

राजतोरण NEWS या बातमीबाबत तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!