कापूरहोळ
सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये प्रत्यक्षात इंधन न भरता पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरल्याचे दाखवून कंपनीची तब्बल ११ लाख ५२ हजार ४९७ रुपयांची आर्थिक फसवणूक करून अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भोर आणि खेडशिवापूर परिसरातील सात पेट्रोल पंपांवर एचपी कंपनीच्या प्रीपेड फ्युएल कार्डचा वापर करून हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी १३ जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ फास्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या हैदराबाद येथील कंपनीच्या पुणे विभागातील सीएनजी पंपांना टोरंट कंपनीच्या गॅसची वाहतूक केली जाते. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अशोक लेलँड वाहनांवरील चालकांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
८ ऑक्टोबर २०२५ ते ८ जून २०२६ या कालावधीत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित वाहने सीएनजी गॅसवर चालणारी असतानाही, वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गॅस भरल्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेल भरल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात इंधन न भरता पेट्रोल पंपांवरून रोख रक्कम स्वीकारून कंपनीच्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भोर ते खेडशिवापूरमधील सात पंपांचा समावेश
या प्रकरणात खेडशिवापूर, वरवे बुद्रुक, केळवडे आणि कापूरहोळ परिसरातील सात पंपाचा समावेश आहे.या संबंधित वाहनांसाठी देण्यात आलेल्या एचपी कंपनीच्या ड्राइव्ह ट्रॅक प्रीपेड फ्युएल कार्डचा वापर करून हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१३ जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा
या प्रकरणी अतुल लेकावळे, राजेंद्र चव्हाण, प्रवीण चव्हाण, तुकाराम गाडे, हनुमंत पोळ, सुनील शेलार, निलेश अस्वले, जयवंत कदम, महेंद्र जाधव, महेंद्र गायकवाड, मच्छिंद्र खुडे, शंकर खुटवड आणि सचिन मळेकर यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंपनीची आर्थिक फसवणूक करून ११ लाख ५२ हजार ४९७ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
राजगड पोलिसांकडून तपास सुरू
याप्रकरणी अविनाश रोहिदास आगळे (वय ४२, रा. गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी राजगड पोलिसात तक्रार दिली असून राजगड चे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.












