कापूरहोळ
भोंगवली तालुका भोर येथे भरदिवसा अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, चांदीची नाणी आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेहला . शनिवार (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी विवेक विष्णू पाटील (वय ६४, रा. भोंगवली, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीची फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यामधील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाचे दुसरे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या नथी, चांदीची १२ जुनी नाणी आणि रोख पाच हजार रुपये असा एकूण ३ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.चोरी करणारा संशयित इसम सावळ्या रंगाचा असून, त्याने जांभळ्या रंगाचा चौकडीचा पूर्ण बाह्यांचा शर्ट परिधान केला होता, अशी माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
भरदिवसा घरफोडी झाल्याने भोंगवली परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान राजगड पोलिसांसमोर आहे.
अधिकचा तपास राजगड पोलीस करीत आहेत












