CNG पाइपलाइनच्या खोदकामामुळे रस्ता धोकादायक ,नियम-अटींचे पालन होतेय का? नागरिकांचा सवाल
कापूरहोळ :
पुणे–सातारा महामार्गालगत सारोळे ते चेलाडी दरम्यान टोरेंटो कंपनीच्या सीएनजी गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामामुळे सर्व्हिस रोडची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी सर्व्हिस रोडपासून सुमारे दीड मीटर अंतर सोडण्याची परवानगी असताना प्रत्यक्ष कामात रस्त्यालगतच खोदकाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कंपनी व ठेकेदाराला नियमांची एवढी मुभा नेमकी कोणी दिली, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच स्थानिक वाहतूक सुरू असते. मात्र पाइपलाइनच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची कड उखडली असून, खड्डे, माती-मुरूमाचे ढिगारे आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
पाइपलाइनचे काम सुरू असताना खोदलेली माती व मुरूम रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याने काही ठिकाणी वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागाच उरलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे खोदलेल्या भागात चिखल व पाणी साचत असून, रस्ता घसरडा होत असल्याने दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि रस्त्याची तत्काळ डागडुजी करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. ‘काम कंपनीचे आणि त्रास नागरिकांचा’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
संबंधित कामासाठी परवानगी व अटी निश्चित असताना त्यांचे प्रत्यक्ष पालन केले जात आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सर्व्हिस रोडपासून निर्धारित अंतर सोडण्याची अट असताना रस्त्यालगत खोदकाम होत असेल तर संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
कंपनी आणि ठेकेदाराला महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांची पर्वा नाही का? कंत्राटदारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
सारोळे ते चेलाडी दरम्यानच्या सर्व्हिस रोडची एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करावी, पाइपलाइनच्या कामामुळे खराब झालेला रस्ता पूर्ववत करावा, खड्डे बुजवावेत, रस्त्यावर पडलेली माती व मुरूम हटवावा तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नियम व परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित कंपनी व ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे. अन्यथा सर्व्हिस रोडची अवस्था आणखी बिकट होऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
” पाईप लाईनचे काम नियमानुसार चालू असून महामार्गचे युटीलिटी जागेत खोदाई करत आहे तसेच दीडमीटर खोल चारी घेऊन पाईप लाईन गाडली आहे.”
ठेकेदार अजिंक्य तावरे














