कापूरहोळ
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हरिश्चंद्री येथे कंटेनरच्या धडकेत कंटेनरच्या चाकाखाली चिरडून तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हरिश्चंद्री येथे संथगतीने उड्डाणं पुलाचे काम सुरु आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे, सर्व्हिस रोडलगतचे खड्डे आणि अपूर्ण बांधकामांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे.तर अपुऱ्या कामामुळे आणखी एक बळी गेला आहे.
घटना स्थळी मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास शुभम चंद्रकांत सूर्यवंशी हे दुचाकीवरून पुणे कडून सातारा कडे दुचाकी क्रमांक MH09FW9171वरून चालले असता हरिश्चंद्री ता भोर येथील सुरु असलेल्या उड्डाणं पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडवर आवाजड कंटेनर क्रमांक MH46AR7409.याने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात शुभम चंद्रकांत सूर्यवंशी, वय 31 रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
राष्ट्रीय महामार्गावरील हरिश्चंद्री परिसरात रस्त्याचे रुंदीकरण आणि अन्य बांधकामांची कामे सुरू आहेत. मात्र, सर्व्हिस रोडच्या कडेला सिमेंट रस्त्यालगत खोदलेले खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असताना, अपूर्ण कामांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अपघातप्रवण ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस, सारोळा यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, मृत दुचाकीस्वाराचा मृतदेह सुमारे अर्धा तास सर्व्हिस रोडवर पडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हरिश्चंद्री परिसरातील पुलावरील तसेच सर्व्हिस रोडवरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, धोकादायक खड्डे बुजवावेत आणि अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे.
महामार्गावरील कामे पूर्ण होण्यास विलंब होत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आणखी एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.













