आर्वी येथील घटना; पोहण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू
कापूरहोळ
हवेली तालुक्यातील आर्वी परिसरातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) दुपारी घडली. खुशबु बसंत बसदेवा (वय १०, रा. आर्वी, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबु ही अन्य मुलांसोबत दुपारी संजय हरिभाऊ घोगरे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी ती पाण्यात बुडाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी शेततळ्यात तिचा शोध सुरू केला.
काही वेळाने खुशबुचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटल, श्रीरामनगर-बांडेवाडी, ता. हवेली येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद राजगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिकचा तपास राजगड पोलीस करीत आहेत













